राग – व्यक्तिमत्त्वाचा आरसा




आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण विविध व्यक्तींना भेटतो  काही शांत, काही हसतमुख, काही समजूतदार तर काही क्षणात भडकणारे. एखादी व्यक्ती समजून घेण्यासाठी आपण तिचं बोलणं, वागणं, शिक्षण, राहणीमान हे सर्व पाहतो. पण त्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं असतं, त्या व्यक्तीला राग किती लवकर येतो आणि त्या रागावर कितपत नियंत्रण ठेवता येतं.


राग ही एक नैसर्गिक भावना आहे. पण त्यावर असलेलं नियंत्रण, त्याची तीव्रता आणि ती व्यक्त कशी होते, यावरून माणसाचा स्वभाव आणि त्याची मानसिक परिपक्वता मोजली जाते. त्यामुळेच कोणत्याही नवीन नात्याची सुरुवात करताना  ते प्रेम असो, मैत्री असो, व्यावसायिक संबंध असो  त्या व्यक्तीची भावनिक प्रतिक्रिया क्षमता तपासणं फार आवश्यक ठरतं.


आपल्या मेंदूतील अमिग्डाला (Amygdala) हा भाग भावनिक प्रतिक्रिया देण्याचे काम करतो. संकट, धोका, अस्वस्थता, भीती  या सगळ्या भावनांवर अमिग्डाला लगेच प्रतिक्रिया देतो. ज्यांचं अमिग्डाला अधिक संवेदनशील असतं, त्यांना राग पटकन येतो. त्यांची तात्काळ प्रतिक्रिया होते, ती कोणत्याही तार्किक विचाराआधी होते. अशा वेळी जर त्या व्यक्तीने आत्मनियंत्रणाचे शिक्षण घेतले नसेल, तर ती त्या क्षणी चुकीचे निर्णय घेऊ शकते, बोलून टाकते आणि नंतर पश्चात्ताप करते. काही क्षणांचा राग संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतो. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं ही मानसिक परिपक्वतेची पहिली ओळख आहे. राग येणं चूक नाही, पण तो योग्य पद्धतीने व्यक्त करता येणं  हे व्यक्तिमत्त्व सुदृढतेचं लक्षण आहे.


जेव्हा एखाद्या व्यक्तीला फार लवकर राग येतो आणि तो सतत रागात असतो, तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण नाही असं मानावं लागतं. अशा व्यक्ती निर्णय घाईत घेतात, नात्यांमध्ये गैरसमज वाढवतात आणि नंतर त्याचे गंभीर परिणाम भोगतात. रागीट व्यक्तींमध्ये एक विशेष वैशिष्ट्य आढळतं  स्वतःभोवती केंद्रित असणं. अशा व्यक्ती इतरांच्या भावनांची, मतांची कदर करत नाहीत. त्यांना स्वतःचं म्हणणं नेहमी खरं वाटतं. अशा स्वभावामुळे त्या सतत नकारात्मकतेचा प्रसार करतात. त्यांच्या भोवती वादविवाद, तणाव आणि दुरावे अधिक असतात.


तसेच, अशा व्यक्ती अनेकदा मनाने कमकुवत असतात. त्यांना स्वतःवर पूर्ण विश्वास नसतो. म्हणूनच त्या सतत शंका घेत राहतात, इतरांच्या चुकीत दोष शोधतात. त्या दुसऱ्यांना दुखावत असतानाही त्यांना त्याची जाणीव राहत नाही आणि नाती हळूहळू मोडू लागतात. बहुतेक वेळा आपण दुसऱ्याचा चेहरा, बोलणं, हसणं यात अडकून जातो. पण खरा स्वभाव तर तणावाच्या प्रसंगी दिसतो.


जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी आयुष्यभरचं नातं जोडायचं असेल, तर त्या व्यक्तीला मुद्दाम एखाद्या प्रसंगात भडकवून पाहा. त्यावेळी ती व्यक्ती काय प्रतिक्रिया देते  हेच तिच्या स्वभावाचं मूळ आहे. जर ती संतुलित राहिली, शांतपणे बोलली, तर ती नात्यासाठी योग्य आहे. पण जर ती लगेच भडकली, ओरडली, टोचून बोलली  तर ती व्यक्ती तुमचं आयुष्य अशांत करू शकते.


रागावर नियंत्रण ही एक सवय आहे, ती संस्कारांनी, अनुभवांनी, वयाने येते. जर तुम्हाला वाटतं की समोरची व्यक्ती रागीट आहे, तर त्यावर प्रेमाने, संयमाने संवाद साधणं गरजेचं आहे. पण काही वेळा सततच्या नकारात्मकतेत स्वतःला हरवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आहे. राग हा प्रत्येकाला येतो, पण जो व्यक्ती तो संयमाने हाताळतो तोच खऱ्या अर्थाने समजूतदार आहे.

नाती, आयुष्य आणि मानसिक शांतता टिकवायची असेल, तर आपल्या भावना ओळखणं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं – हाच खरा मार्ग आहे.


"जिथे राग असतो, तिथे शब्द जखमा करतात.

  जिथे संयम असतो, तिथे नाती फुलतात."



 © विजय कमल 
Powered by Blogger.